मुंबई : काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला.मिलिंद देवरा यांच्या प्रवेशामुळे मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघाची गणिते बिघडण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा दक्षिण मुंबईवरील दावा भाजपला सोडावा लागणार असून मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपला ही जागा शिंदेंना द्यावी लागणार आहे.
मागील काही दिवसांपासून भाजपने दक्षिण मुंबईसाठी तयारी सुरू केली होती. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांची नावे या जागेसाठी चर्चेत होती. मात्र देवरांच्या प्रवेशाने गणितं बदलली आहेत. मराठी-अमराठी मतांचे समीकरण बघता भाजपला ही जागा शिवसेनेसाठी सोडावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
१० तारखेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल दिला. एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार पात्र करत कुणावरही अपात्रतेची कारवाई त्यांनी केली नाही.
नार्वेकरांच्या निकालानंतर शिंदेंनी देवरांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने, यामागे राजकीय खेळी असल्याचं बोललं जात आहे. ज्या दक्षिण मुंबईच्या जागेवर नार्वेकरांचा दावा होता त्याच जागेवर आता मिलिंद देवरा हक्क सांगणार हे नक्की. त्यामुळे आधी निकाल येऊ देणे आणि मग देवरांना प्रवेश देणे; यामागे मुत्सद्देगिरी असल्याचे बोलले जात आहे.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ म्हणजे आताचे खासदार राहुल शेवाळे जिथून निवडून आले आहेत तो मतदारसंघ. चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहीम आणि अणुशक्तीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात ते दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात. पक्षीय बलाबल सांगायचे झाल्यास, दोन मतदारसंघांतून भाजपचे आमदार, दोन मतदारसंघांवर शिवसेना, त्यातील एक ठाकरे तर दुसरा शिंदे गटाचा आमदार आणि दोन जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार येतात. त्यामुळे महाविकास आघाडीबाबत अन् महायुतीबाबत बघितले तर सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी या लोकसभा मतदारसंघात येतात.