मुंबई : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पृथ्वी शॉच्या वाढदिवसानिमित्त आकृतीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने पृथ्वीवरील प्रेम व्यक्त करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा मोडल्याची बातमी समोर आली होती. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा पॅचअप झाल्याचे आकृतीने स्पष्ट केले होते.
पृथ्वी शॉच्या वाढदिवसानिमित्त आकृती अग्रवालने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने पृथ्वीला आयुष्यात भरभरून आनंद, यश आणि उत्तम आरोग्य मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली.
पृथ्वीच्या क्रिकेटवरील प्रेमाचे आणि मेहनतीचेही तिने कौतुक केले. क्रिकेट खेळण्याची त्याची आवड, खेळाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण यांचा उल्लेख करत तिने त्याला स्वत:वर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला.
तुला अजून अनेक सामने खेळायचे आहेत. अनेक विक्रम करायचे आहेत आणि अनेक विजय मिळवायचे आहेत अशा शब्दांत तिने पृथ्वीला प्रोत्साहन दिले.
दिवाळीच्या शुभेच्छाही तिने या पोस्टमधून दिल्या. दिवाळीचा सण पृथ्वीच्या आयुष्यात नवीन सुरुवात, सकारात्मकता, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, अशी भावना तिने व्यक्त केली.
‘मी नेहमीच तुझ्यासाठी आनंदाने टाळ्या वाजवत राहीन. तुझ्या प्रत्येक यशाचा आनंद साजरा करेन आणि तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवेन, असेही तिने म्हटले आहे. अखेरीस ‘माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा, आय लव्ह यू,’ असे लिहित तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मार्चमध्ये साखरपुडा, सप्टेंबरमध्ये ब्रेकअपची घोषणा
पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी ८ मार्च २०२६ रोजी मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला होता. दोघांच्या नात्याची सोशल मीडियावरही मोठी चर्चा झाली होती. मात्र, १७ सप्टेंबर २०२६ रोजी आकृतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत साखरपुडा मोडल्याचे जाहीर केले. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता.
















