नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे सध्या प्रत्येक क्षेत्रातील कामगारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. गांधी यांनी बुधवारी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी तेलंगणातील सिंगरेनी येथील कोळसा खाणीतील कामगार आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महत्वाच्या क्षेत्रात खासगीकरण नको, अशी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. कोळसा खाणीतील कामगार आणि कर्मचाऱ्यांना भेटण्याची आणि बोलण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यावर मला कळले की, प्रत्येक समस्येचे मूळ खाणींचे खाजगीकरण आहे.
खाणींच्या खाजगीकरणावर चिंता व्यक्त करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, हे कामगार कायद्यांचे उल्लंघन आहे. ते म्हणाले की, खाणींचे खाजगीकरण करणे म्हणजे कामगारांना बंधपत्रित मजुरांकडे ढकलण्यासारखे आहे. ‘हे खाजगीकरण म्हणजे कामगार कायद्यांचे उल्लंघन आणि कामगारांना बंधपत्रात ढकलण्याचे साधन आहे. काही भांडवलदारांना याचा फायदा होईल आणि त्याचा परिणाम असा होईल जे मी बऱ्याच काळापासून सांगत आहे की, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील आणि गरीब अधिक गरीब.
यावेळी कोळसा खाणीतील कामगार आणि कर्मचाऱ्यांनी राहुल गांधींना विनंती केली की, काँग्रेस आपल्या जहानाम्यात लोकांना फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने, अशा खाजगीकरणाविरोधात आपली भूमिका स्पष्ट करावी आणि याबाबत त्यांना खात्री द्यावी. राहुल गांधींनी त्यांच्या भेटीदरम्यान सिंगारेनी कोळसा खाणींचे खाजगीकरण केले जाणार नाही असे आश्वासन दिले आणि या खाणी अदानींना विकण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु त्यांच्या प्रयत्नांनी ते थांबले, असे ते म्हणाले.