नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आपण येत्या १९ फेब्रुवारीला महाकुंभला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेस नेते अजय राय यांनी ही घोषणा केली आहे. या दरम्यान, अजय राय यांनी नवी दिल्लीत महाकुंभला जाणा-या प्रवाशांची चेंगराचेंगरी झाल्यावरुन सत्ताधारी पक्षाला घेरले आहे. ही दुर्दैवी घटना झाली आहे. याची जबाबदारी सरकारची आहे. तुम्ही सर्वांना आमंत्रण तर दिले परंतू व्यवस्था चोख ठेवली नाही. या प्रकरणात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी अजय राय यांनी केली आहे.
कुंभमध्ये काँग्रेसनेते याआधी देखील गेले आहेत. आमच्या नेत्या प्रियंका गांधी आणि इतर अनेक नेतेही कुंभला गेलेले आहेत. आता आम्ही देखील कुंभला जाणार आहोत आणि हर हर महादेवच्या जयघोषात पवित्र स्रान करणार आहोत असे अजय राय यांनी म्हटले आहे. महाकुंभात जगभरातून भाविक पोहचत आहेत आणि महाकुंभाचा कालावधी देखील आता आटोपत आला आहे. २६ मार्च रोजी कुंभचा शेवटचा दिवस आहे.
राहुल गांधी यांच्या महाकुंभ स्रानाला जाण्याच्या चर्चानंतर राजकारण तापले आहे. एकीकडे काँग्रेस म्हणतेय की त्यांचे अनेक याआधीही कुंभला गेले आहे, तर दुसरीकडे भाजपाने यास नौटंकी म्हटले आहे. व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेस नेते संगमावर जात आहेत.