21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीययूपीएससी परीक्षेतील बोगसगिरीवर प्रियंका गांधींनी व्यक्त केला संताप

यूपीएससी परीक्षेतील बोगसगिरीवर प्रियंका गांधींनी व्यक्त केला संताप

मुंबई : राज्यात अगोदर स्पर्धा परिक्षांच्या पेपरफुटीवरुन किंवा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करुन सरकारी नोकरी प्राप्त केल्याची प्रकरणे समोर येत होती. मात्र, थेट यूपीएससी सारख्या केंद्रीय आयोगाच्या परीक्षेत बोगस प्रमाणपत्र सादर करुन चक्क आयएएस पदाला गवसणी घातल्याचा प्रकार उघडकीस आल्याने राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरले आहे. यापूर्वी नीट परीक्षा आणि युजीसी नेट परीक्षांचा असाचा सावळा-गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर, आता चक्क युपीएससी परीक्षेतील ही बोगसगिरी पुढे आल्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारला सवाल केले आहेत. तसेच, यूपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी किती मेहनत घेतात, हे मी स्वत: पाहिले आहे असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर बोगस प्रमाणपत्रावरुन प्रशासन चांगलेच ढवळून निघाले आहे. केवळ, राजकीय नेत्यांच्याच बोगसगिरीवरुन, भ्रष्टाचारावरुन सातत्याने प्रश्न विचारले जातात. मात्र, पूजा खेडकर यांच्यामुळे प्रशासनातील उच्च पदस्थ अधिका-यांचे काळे कारनामे आता समोर येत आहेत. एकापाठोपाठ एक असे अनेक बोगस अधिकारी या घटनेनंतर समोर आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पूजा खेडकर यांचे प्रकरण माध्यमांत आल्यानंतर आता यूपीएससीने दखल घेत, पूजा खेडकर यांना नोटीसही बजावली आहे. तुमच्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करु नये, अशा शब्दात आयोगाने खेडकर यांच्यावरील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेमुळे यूपीएससी परीक्षेतही बोगसगिरी चालत असेल तर सर्वसामान्यांनी परीक्षा द्यायच्या की नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विट करुन सरकारला प्रश्न विचारले आहेत.

युवकांच्या विश्वासावर मोठा आघात
मी स्वत: यूपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी दिवसरात्र एक करुन मेहनत घेताना, आपल्या भविष्याची स्वप्न रंगवताना पाहिले आहेत. त्यामुळे, यूपीएससी परीक्षेतील घोटाळ्याचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे, कारण या प्रक्रियेतील एकही बोगसगिरी अनेक प्रश्न उपस्थित करते. लाखो युवकांचे स्वप्न आणि त्यांच्या विश्वासावर मोठा आघात करते. त्यामुळेच, जनता आणि युपीएससीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

प्रमाणपत्र तपासणीची व्यवस्था निर्माण होईल का?
राजकीय हस्तक्षेपाने या उच्च पदावर नियुक्त झालेले लोकच यास जबाबदार आहेत? जर असतील तर त्यांच्यावर कारवाई कधी, असाही सवाल प्रियंका गांधींनी विचारला आहे. तसेच, नकली प्रमाणपत्रामुळे एससी, एसटी, ओबीसी, विकलांग व ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांना मिळणा-या संधीवर बाधा आणतो. त्यामुळे, हे प्रमाणपत्र तपासणी करणारी एखादी संस्था विकसित केली जाईल का?, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR