सोलापूर : येथील भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्यावतीने भगवान परशुराम जयंती निमित्त मंगळवार दिनांक २९ एप्रिल रोजी सोलापूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावर्षीच्या मिरवणुकीचे विशेष म्हणजे या मिरवणुकीचे चित्रीकरण करून पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बी.जी. कुलकर्णी आणि महिला अध्यक्षा डॉ. माधुरी दबडे यांनी दिली आहे.
मंगळवारी दुपारी तीन वाजता दत्त चौकापासून मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक तेथून नवी पेठ, मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक मार्गे चार पुतळा येथे पोहोचणार आहे. त्या ठिकाणी सायंकाळी सहा तीस वाजता भगवान परशुराम यांच्या मूर्तीची वेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषिकेश दादेगावकर आणि गोविंद गवई यांच्या नेतृत्वाखाली ५१ पूर्वहितांच्या मंत्र घोषात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सोलापूर शहरातील सर्व समाजातील नागरिकांना दर्शनाचा लाभ घेता येईल. तसेच त्याच ठिकाणी दर्शनानंतर प्रसाद म्हणून कैरीची डाळ आणि पन्हे वाटप करण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सुमारे २०० ते २५० युवक युवतींचे लेझीम पथक, महिलांची भजनी मंडळ आणि जवळपास ६०० नागरिक एकाच पोशाखात मिरवणुकीत सहभागी होणार. याशिवाय या मिरवणुकीत नाट्य, संगीत, साहित्य, कला, डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यावसायिक, राजकीय पक्ष, विविध संघटनांचे पदाधिकारी, समाजातील सर्व क्षेत्रातील अनेक व्यक्ती सहभागी होणार असून भव्य दिव्य अशी ही मिरवणूक निघणार आहे, अशी माहिती या जन्मोत्सवाच्या निमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या स्वागत समितीचे अध्यक्ष प्रमोद तमन्नवार यांनी दिली.
तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी मंगळवारी २९ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता निघणाऱ्या भगवान परशुराम जन्मोत्सव मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष बी.जी. कुलकर्णी आणि महिला अध्यक्ष डॉ. माधुरी दबडे यांनी केले आहे.