कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगड येथे संचारबंदी प्रशासनाने पाच महिन्यांनंतर उठवली. ही संचारबंदी उठवताना काही नियम व अटी घातल्या होत्या. यानंतर आता पर्यटक गडावर जात आहेत. दरम्यान भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी सांगलीत गडावर कोणतेही धार्मिक उपक्रम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत प्रशासनाला इशारा दिला होता. यानंतर शनिवारी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने येथे होणा-या बाबा मलिक रेहान मीरासाहेब उरूसाला परवानगी नाकारली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर अनधीकृत बांधकामे हटवावीत अशा मागणीसाठी येथे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन केले होते. ज्याला हिसंक वळण लागल्याने राज्य शासनाने पाच महिन्यांपूर्वी संचारबंदी लागू केली होती. अखेर जिल्हा प्रशासनाने शिथिल केली आहे. याबाबतचा अध्यादेश जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता.७) जारी केला आहे.
दरम्यान रविवारी (12 जानेवारी) किल्ले विशाळगडावर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी (ता.१०)आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी, किल्ले विशाळगडावर उरूस भरवून हिंदू समाजाला चिथवण्याचे काम कोणी करू नये. विशाळगडावरील कायदा व सुव्यवस्था कोणीही खराब करू नये. शासन व सरकार म्हणून आम्ही यावर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले होते. त्यांनी हा इशारा सांगली दौ-यावर असताना दिला होता.
यानंतर आता विशाळगडावर कोणताही जमाव जमू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विशाळगडावरील धार्मिक कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. तसेच जोपर्यंत नियमानुसार अतिक्रमण संदर्भातली कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावरती कोणतेही सण उत्सव साजरे करण्यास मनाई केली आहे. तर कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी परवानगी नाकारल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.