बदलापूर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा गोळीबारात मृत्यू झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी गुरुवारी त्याचे अंतिम संस्कार करण्यासाठी सुरक्षेची मागणी केली आहे. त्यांचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा अद्याप मिळालेली नाही. जागेच्या शोधासाठी अक्षयचे कुटुंबीय फिरत आहेत. अशातच आता अक्षय शिंदेच्या वडिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
अक्षय शिंदेच्या वडिलांनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले. यात अण्णा शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात, अमित शाह यांच्या कडे स्वत:चे कुटुंब आणि वकील अमित कटारनवरे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे किरीट सोमय्या यांना संरक्षण दिले आहे, त्यापेक्षा जास्त संरक्षण आम्हाला द्यावे, कारण किरीट सोमय्या यांच्यापेक्षा जास्त धोका आम्हाला सत्ताधारी, माफिया आणि त्यांच्या चेले चपाट्या कडून आहे असे पत्रात सांगून संरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे.
पत्रात पुढे लिहिले की हे प्रकरण झाल्यानंतर आम्हाला तसेच आमच्या वकिलांना धमक्या येत आहेत. अक्षय शिंदेचा खून राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचे देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आता या पत्रावर काय प्रतिक्रया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे. दरम्यान आम्ही अक्षयला दफन करण्यासाठी जागा शोधत आहोत. पोलिसांनी आम्हाला काही ठिकाणे दाखवण्यासाठी बोलावले आहे. आम्ही मृतदेह सुरक्षित ठिकाणी पुरू, असे अक्षय शिंदेचे काका अमर शिंदे यांनी सांगितले. यासाठी त्यांनी जागेची मागणी केली आहे.
तर दुसरीकडे अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी अंबरनाथ दफनभूमीची पाहणी केली आहे. परवानगीसाठी आई-वडील अंबरनाथ नगरपालिकेत अर्ज देण्यासाठी गेले होते. त्यांनी अक्षय शिंदेचा मृतदेह अंबरनाथ दफनभूमीत दफन करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र मनसेने याला विरोध केला आहे. याबाबत मनसे पदाधिका-यांनी अंबरनाथ पालिकेला पत्र दिले आहे.