सोलापूर : प्रीपेड आणि स्मार्ट मीटरला विरोध करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महावितरणच्या सोलापुरातील कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्यादा आलेले बिलाचे पोस्टर कार्यकारी अभियंतांच्या दालनासमोर लावून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जानेवारी महिन्यात ७१० रुपये बिल आले होते, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ३६१० रुपये कसे काय बिल आले याबाबतचाही सवाल महावितरणला आंदोलनकर्त्यांनी विचारला.
सोलापुरात शिवसेनेचा विरोध असतानाही लपूनछपून काही ठिकाणी प्रीपेड मीटर बसविण्यात आले आहेत. त्या ग्राहकांना आता नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ज्या ग्राहकाला मागच्या महिन्यात ७०० रुपये बिल येत होते त्याला प्रीपेड मीटर बसवल्यानंतर पहिल्याच महिन्यात ३६०० रुपयांचे वीज बिल पाठवून महावितरणने झटका दिला आहे. संबंधित ग्राहकाने याबाबत शिवसैनिकांशी संपर्क साधला. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी महावितरण कार्यालयात आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख महेश
धाराशिवकर, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, विधानसभा संघटक बाळासाहेब गायकवाड, शशिकांत बिराजदार, लहू गायकवाड, दत्ता खलाटे, उज्वल दीक्षित, आबा सावंत, अण्णा गवळी, मनोज कासेगावकर, प्रकाश काशीद यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. याचवेळी विविध मागण्यांचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांना देण्यात आले. मागण्यांचा सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचाही इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
आंदोलनकर्त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना चांगलाच जाब विचारत पुढील काळात प्रीपेड मीटर लावताना जर कोणी कर्मचारी आढळला तर शिवसैनिक त्या कर्मचा-याला शिवसेना स्टाइलने ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी वाढीव आलेल्या बिलाचे पोस्टर अधिका-यांच्या केबिनला लावून धिक्कार करण्यात आला.