मोहोळ : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षाच्या मुलीवर ४५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून निघृणपणे केलेली हत्या निषेधार्थ असून शासनाने या प्रकाराला पाठीशी न घालता आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी मोहोळ तालुका व शहर समस्त मुस्लीम समाजातर्फे तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
जत तालुक्यामधील करजगी गावांमधील पांडुरंग कल्ली या नराधमाने चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या केली. सदरची बाब ही माणुसकीला काळिमा फासणारी असून संबंधित आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच संबंधित आरोपीला शासन व प्रशासनाने पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर मुस्लीम समाजाच्यावतीने यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मोहोळ तालुका व शहर समस्त मुस्लीम समाजबांधवांच्यावतीने मोर्चाच्याप्रसंगी देण्यात आला.
यावेळी माजी सरपंच बिलाल शेख, भाजपचे सुशील क्षीरसागर, आरपीआयचे हनुमंत कसबे, शिवसेनेचे शिवरत्न दीपक गायकवाड, इब्राहिम शेख, माजी नगरसेवक मुस्ताक शेख यांनी आपल्या भाषणातून संबंधित घटनेचा निषेध करून तत्काळ आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. यावेळी डॉ. रिजवान शेख, अनिस कुरेशी, मुस्ताक शेख, किशोर पवार, सादिक अत्तार, अमर शेख, नसीर मोमीन, रफिक हरणमारे, झहीर शेख, मिनाज सुरकी, अॅड. इमरान पटेल, डॉ. जलानी खान, ईशान शेख, आरिफ तलफदार, अकबर फराश, रिहान हुंडेकरी, झिशान सादिक शेख आदींसह मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.