मुंबई : प्रतिनिधी
दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतक-यांच्या विविध प्रश्नांविषयी भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. या मोर्चा दरम्यान ट्रॅक्टर रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर रोजी जळगाव येथे, १ डिसेंबर रोजी दिंडोरी येथे तर ५ डिसेंबर रोजी अमरावती येथे हा मोर्चा निघेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील शेतक-यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. आधी दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, अवकाळी पावसाने हैराण झाला आहे. अवकाळी पावसामुळे आलेली पिकेही वाया गेली. काही पिकांवर रोगराई पसरली आहे. जी पिके शिल्लक आहेत, त्यांना बाजारभाव व्यवस्थित मिळत नाही. एकंदरच महाराष्ट्रातील वेगवेगळ््या भागातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या या महत्त्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमचा हा शेतकरी आक्रोश मोर्चा असेल असे त्यांनी सांगितले.
या सरकारची अडचण अशी आहे की, त्यांना काहीही सांगितले तर ते महाविकास आघाडीकडे बोट दाखवतात. पण आज ते स्वत: काय करतायेत, हे शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोनाचे संकट एवढे प्रचंड मोठें असतानादेखील महाविकास आघाडी शेतक-यांच्या बाजूने उभी राहिली, असेही ते म्हणाले.
शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा
आज जळगावात आयोजन, ट्रॅक्टर रॅलीही निघणार