नवी दिल्ली : देशात हुकूमशहांकडून आंदोलनावर बंदी आणण्यात आली आहे का? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. लोकशाहीप्रधान देशात अशा प्रकारे आंदोलनावर बंदी घालता येणार नाही. जर अशी जबरदस्ती केली गेली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, आंदोलन केले म्हणून पाच काय, पाचशे गुन्हे दाखल होऊ द्यात. सरकारला याचे काय कौतुक वाटते आहे का? मुंबईत आमच्या आंदोलकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि अमित ठाकरे यांच्या नावांचा समावेश आहे. गुन्ह्यांची भीती नक्की कोणाला दाखवत आहात? करा गुन्हे दाखल आणि करा अटक! पण आता तुमच्या जाण्याची वेळ आली आहे. येत्या सहा महिन्यांत तुम्हाला दिल्लीतून गाशा गुंडाळावाच लागेल. संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगातील कथित गैरप्रकार थांबले पाहिजेत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. निवडणूक आयोगावर कोणताही राजकीय दबाव असता कामा नये. यासोबतच ‘एसआयआर’ प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी आणि मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या सर्व १३ कोटी मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत.
राहुल गांधी खासदारांशी चर्चा करणार
संजय राऊत म्हणाले की राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना आणि खासदारांना चहापानासाठी आमंत्रित केले आहे. कालचे आंदोलन पूर्णपणे यशस्वी झाले आहे. आजच्या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होऊन दिशा ठरवली जाईल. त्यानंतर राहुल गांधी स्वत: पत्रकारांशी संवाद साधतील. सध्या आम्ही सर्व नेते व खासदार दिल्लीतच असून सायंकाळी अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.
आदेश आला की आंदोलन : वडेट्टीवार
आज काय ठरते ते माहिती नाही पण आदेश आला की आम्ही तयारीमध्येच आहोत. काल सर्वांनी पाहिले की रस्ते जॅम केले, बॅरिकेट लावले, रेल्वे थांबवली. काल जमलेल्या जनसागरानंतर सरकारला लक्षात आले पाहिजे की ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही देशातील जनतेची मागणी आहे असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
















