धाराशिव : प्रतिनिधी
स्थलांतर रोखण्यासाठी ग्रामीण भागातील शेतमजुरांनी दिवाळीपूर्वी घरटी दहा हजार रुपयांचे अनुदान द्यावे, मनरेगाची कामे सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा संयोजक संजय पाटील दुधगावकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की दुष्काळामुळे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. त्याचा फटका शेतकरी व शेतमजुरांना बसला आहे. शेतीची कामे नसल्याने शेतमजुरांंवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केलेला असून दुष्काळात होरपळणा-या शेतमजुरांना तातडीने दहा हजार रुपये घरटी मदत करणे अत्यंत गरजेचे आहे.
तलावांतील गाळ काढणे, नद्या, नाल्यांचे खोलीकरण करणे, बाांंध बंधिस्ती करणे आदी कामे मनरेगातून मजुरांसाठी उपलब्ध करून द्यावीत. कामे सुरू झाली तर दुष्काळामुळे झालेली बेरोजगारी दूर होऊ शकेल, अन्यथा दिवाळीपूर्वीच शेतमजुरांचे मोठ्या संख्येने शहरांकडे स्थलांतर होण्याची शक्यता आहे. या उपाययोजना तातडीने कराव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
















