मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा आणि गाठीभेटींचा धडाकाच सुरू केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगही जोमाने कामाला लागले असून भरारी पथके, स्थिर पथके, पोलिस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करत आहे.
विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोगानेही यापूर्वी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदानादिवशी सार्वजनिक सुटी देण्यात येत असल्याचे सांगितले होते. तसेच, राज्यातील कामगार आयुक्तांना तसे निर्देशही दिले होते. आता, राज्य सरकारकडून परिपरत्रक जारी करत २० नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान दिनी २० नोव्हेंबर रोजी सुटी जाहीर झाली आहे. त्यानुसार, क्रमांक सार्वसु-१०२४/१२६ (२९) लेखअधिनियम, १८८९ (१८८९चा २६) च्या कलम २५ नुसार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८ जेयुडीएल तीन दि. ८ मे १९६८ अन्यये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुटी जाहीर आहे असे परिपत्रकच राज्य शासनाच्यावतीने करण्यात आला आहे.
मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी. तसेच केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्याचे सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभाग यांनी सदर अधिसूचना काढून प्रसिद्ध करावी, असे आदेशही महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दिले आहेत. शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.