वॉशिंग्टन/डब्लिन : आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वाढता वापर आता जगभरात चर्चेचा विषय ठरत असतानाच, त्याविरोधात अमेरिका आणि युरोपमधील अनेक शहरांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. एआयमुळे नोक-यांवर येणारे संकट, डेटा सेंटरसाठी होणारा प्रचंड वीज आणि पाण्याचा वापर तसेच पर्यावरणावर होणारे परिणाम यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समोर आले आहे.
आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे डेटा सेंटरच्या वाढत्या विस्ताराविरोधात सुमारे दोन हजार नागरिकांनी मोर्चा काढला. तर फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे जवळपास १ हजार ३०० लोक या आंदोलनात सहभागी झाले. फिनलंडमधील अन्य काही शहरांमध्येही निदर्शने करण्यात आली. डब्लिनमध्ये आंदोलकांनी पर्नेल स्क्वेअर येथून आयरिश संसदेपर्यंत मोर्चा काढला. नव्या डेटा सेंटरच्या उभारणीला परवानगी देण्यापूर्वी त्यांचा पर्यावरणावर आणि स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम तपासावा, अशी त्यांची मागणी होती.
ही आंदोलने स्टॉप डर्टी डेटा सेंटर्स या मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पर्यावरणवादी संघटना, स्थानिक नागरिकांचे गट आणि डिजिटल अधिकारांसाठी काम करणा-या संघटनांचा सहभाग होता. ६ नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅम येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. मायक्रोसॉफ्टच्या नव्या डेटा सेंटरच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शंभरहून अधिक आंदोलकांनी प्रवेश केला. काही आंदोलक क्रेनवर चढले, तर काहींनी फ्लेअर पेटवून निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांशीही त्यांची झटापट झाली. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे १५० ते २०० जणांना ताब्यात घेण्यात आले.
रोजगार कपात आणि आर्थिक संकट
चॅटजीपीटी, मिडजर्नी यांसारख्या एआय साधनांमुळे ग्राफिक डिझायनर्स, लेखक, कोडिंग करणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आणि ग्राहक सेवा (कस्टमर केअर) प्रतिनिधींच्या नोक-यांवर गदा आली आहे. कंपन्या मानवी कर्मचा-यांना काढून एआयचा वापर करत असल्याने बेरोजगारीचा आलेख वाढला आहे.
कला आणि कॉपीराईटची चोरी
युरोपमधील हजारो चित्रकार, लेखक आणि संगीतकारांनी एआय कंपन्यांवर न्यायालयात दावे ठोकले आहेत. एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या हक्काच्या कलाकृतींचा, साहित्याचा बेकायदेशीर वापर केला गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गोपनीयता आणि डीपफेकचा सुळसुळाट
इंटरनेटवरील वैयक्तिक डेटा चोरून एआय अधिक सक्षम केले जात आहे. तसेच, महिला आणि प्रसिद्ध व्यक्तींचे डीपफेक व्हीडीओ व फोटो बनवून त्यांचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढल्याने महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अमेरिकेतील हॉलीवूड संप आणि निदर्शने
अमेरिकेत लेखक आणि अभिनेत्यांच्या संघटनांनी एआयच्या वापरा विरोधात ऐतिहासिक संप पुकारला होता. सिलिकॉन व्हॅलीमध्ये तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्यालयाबाहेर नागरिक मोठ्या संख्येने निदर्शने करत आहेत.
युरोपमधील कायदेशीर लढा आणि मोर्चे
युरोपियन युनियनमधील फ्रान्स, जर्मनी आणि इटली सारख्या देशांमध्ये कामगार संघटनांनी एआयच्या विरोधात भव्य मोर्चे काढले आहेत. युरोपमधील नागरिकांनी यंत्रांचे गुलामीकरण नाकारा अशी मोहीम सुरू केली आहे.
















