मुंबई : महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे अघोषित आणीबाणी आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला. या संदर्भात मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली, तीच गोष्ट भाजपने कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे. याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडीने जनसुरक्षा विधेयकाला यापूर्वीच विरोध दर्शवला होता आणि आता याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. इतर राजकीय पक्षांनीही या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एके-४७ (एके-४७) आणि टॉमी गन यांसारख्या शस्त्रांची पूजा करतानाचे फोटो सगळीकडे उपलब्ध आहेत. भारतीय सैन्यात विशिष्ट सैनिकांनाच ही शस्त्रे वापरण्याची परवानगी आहे असे असताना आरएसएसकडे ही शस्त्रे कुठून आली? सरकार त्यांच्यावर अर्बन नक्षल म्हणून कारवाई करणार आहे की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्या शस्त्र पूजेच्या फोटोवर विरोधीपक्ष ही शांत आहे.
सभागृहात विरोधाचा अभाव
ज्यांच्याकडे ही शस्त्रे आहेत, त्यांच्यावर या जन सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे की नाही? कायद्यानुसार पिस्तूल बाळगणे कायदेशीर आहे, परंतु, एके-४७ आणि टॉमी गन यासारखी शस्त्रे बाळगणे कायद्याने गुन्हा आहे आणि हे राज्य उलथवून टाकण्यासारखे आहे. आरएसएस ही शस्त्रे जवळ बाळगतेय, त्यावर या कायद्यांतर्गत आधी कारवाई करावी. जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात आक्रमकपणे विरोध झाला नाही. लोकांनी समाज माध्यमांवर विरोध केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मीडियासमोर येऊन बोलणे ही नौटंकी आहे.
















