इस्लामाबाद : काही दिवसांपूर्वी ट्रेनचे अपहरण करून शेकडो प्रवाशांना ओलीस ठेवत पाकिस्तानला जेरीस आणणा-या बलूच आर्मीने पाकिस्तानवर पुन्हा एकदा तगडा वार केला आहे. बलूच आर्मीने पाकिस्तानी लष्कराच्या बसवर पुलवामासारखा आत्मघातकी हल्ला करताना स्फोटकांनी भरलेले वाहन आदळवले. पाकिस्तानमधील क्वेटा येथून ताफ्तान येथे जात असलेल्या लष्कराच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला असून पाकिस्तानी सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार यात हल्ल्यात ७ सैनिकांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. तर बीएलएने ९० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे.
बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला क्वेटा येथून १५० किमी अंतरावर असलेल्या नोकशी येथे झाला. हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने परिसरात हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात केले आहेत.
हल्ल्याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाकिस्तानी लष्कराचा एक ताफा हा ताफ्तानच्या दिशेने जात होता. या ताफ्यामध्ये लष्कराच्या ७ बस आणि २ इतर वाहने होती. या ताफ्याला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार आयईडी लादलेले एक वाहन पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यातील बसवर आदळवण्यात आले. त्यामुळे मोठा स्फोट झाला.
सैनिकांवर बेछूट गोळीबार
बलूच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलूच लिबरेशन आर्मीच्या द मजिद ब्रिगेड या आत्मघातकी पथकाने हा हल्ला घडवून आणला. पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यामध्ये एकूण आठ बस होत्या. त्यापैकी एक बस स्फोटामध्ये पूर्णपणे दुर्घटनाग्रस्त झाली. या हल्ल्यानंतर फतेह स्क्वॉडने पाकिस्तानी सैन्याच्या दुस-या बसला घेराव घालून त्यामधील सैनिकांवर बेछूट गोळीबार केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सैनिक मृत्युमुखी पडले. आतापर्यंत या हल्ल्यात ९० सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.