पुणे : पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करी करणा-यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने झिरो टोलरन्स टू ड्रग या मोहिमेअंतर्गत कारवाई करून ५ गुन्हे दाखल करून ५ नायजेरियन नागरिकांसह ७ जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ३५ लाख रुपये किमतीचे १७१ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ड्रग्ज फ्री पुणे हे अभियान राबवले आहे. या अनुषंगाने पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील अभिलेखावरील अमली पदार्थ गुन्ह्यातील आरोपींची चेकिंग मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गुन्हे शाखेने बुधवारी (दि.२०) १५ पथके तयार करून हडपसर आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुरसुंगी, येवलेवाडी, उंड्री, पिसोळी, मांजरी, वानवडी, कोंढवा या हद्दीत पेट्रोलिंग करून आरोपींची चेकिंग करण्यात आली.
पोलिसांच्या पथकांनी रेकॉर्डवरील आरोपी तसेच पेडलर यांना चेक केले. या कारवाईत पाच आरोपींच्या घरांची झडती घेतली असता त्यांच्या घरात अमली पदार्थ मिळाला. पोलिसांनी अमली पदार्थ जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी आयडोफो येनेडयु, ओलामाईड कायोदे, कोहिंदे इद्रीस हे तीन आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत.