पुणे : राज्यातील किमान तापमानात मोठी घट झाली असून, कडाक्याची थंडी पडली आहे. पुण्यात देखील यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी किमान तापमान बुधवारी नोंदवले गेले. शिवाजीनगर येथे किमान तापमान ९.७ नोंदले असून इतर ठिकाणी देखील असेच तापमान आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच गारठले आहेत.
यंदा पहिल्यांदाच शिवाजीनगरचे तापमान ९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. त्यानंतर एनडीए आणि हवेली येथे तर ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज पहाटेपासूनच हवेत खूप गारठा जाणवत होता. सध्या राज्यामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरणाचा अनुभव येत आहे. तसेच राज्यामधील बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. तापमानाचा पारा घसरला असल्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील हुडहुडी भरली आहे. जळगाव, धुळे येथे पारा १० अंशांच्याही खाली गेला आहे. आज बुधवारी (दि.२४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
देशाच्या उत्तर भारतामध्ये सतत थंडीत चढ-उतार पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे तर मंगळवारी नीचांकी १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच उत्तर प्रदेशात किमान तापमान ३ ते ५ अंशांदरम्यान नोंदले गेले आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगढ, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही ६ ते १० अंशांच्या दरम्यान तापमान आहे. सध्या उत्तर भारतामध्ये पहाटे धुके, थंडीची लाट, गारठा वाढला आहे.