नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंजाब पोलिसांनी दिलेली सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. आज प्रचारावेळी केजरीवालांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यामुळे निवडणूक आयोग व दिल्ली पोलिसांनी आक्षेप घेतल्याने ही सुरक्षा काढून घेण्यात आल्याचे पंजाबच्या पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पंजाबमध्ये आपच्या पक्षाचे सरकार आहे. यामुळे आपचे प्रमुख असल्याने केजरीवाल यांना पंजाब सरकारने सुरक्षा पुरविली होती. वेळोवेळी केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमक्या येत असतात. आम्ही त्या संबंधीत एजन्सीना देत असतो. निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही पंजाब पोलिसांची सुरक्षा मागे बोलविली आहे. आम्ही त्यांना आमच्या चिंता सांगितल्या आहेत. सुरक्षा काढली असली तरी आम्ही त्यांच्या संपर्कात राहणार. तसेच दिल्ली पोलिसांना आम्हाला समजलेल्या घटना कळवत राहणार असे, पंजाब पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले.
तर दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आलेली आहे. त्यांना दुस-या राज्याचे संरक्षण मिळू शकत नाही, तसेच दुसरे राज्य संरक्षण देऊ शकत नाही. जर दुस-या राज्यातील व्हीव्हीआयपी आले आणि त्याच्यासोबत सुरक्षा असेल, तर त्यांनाही ते फक्त ७२ तासांसाठी सुरक्षा देऊ शकतात. त्यासाठी दिल्ली पोलिसांनाही माहिती द्यावी लागते, असे म्हणाले.
आता ऐन दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांची सुरक्षा काढण्यास लावल्याने प्रचारात हा मुद्दाही कळीचा ठरणार आहे. दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. ते राज्याच्या ताब्यात द्या असे केजरीवाल अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, दोन एस्कॉर्ट्स, वॉचर्स, सशस्त्र रक्षक आणि शोध कर्मचारी असे सुमारे ६० सुरक्षा कर्मचारी मिळतात. गृहमंत्रालयाची यामागे मोठी भूमिका आहे. दिल्ली पोलिसांना पत्र लिहून केजरीवाल जेव्हा जेव्हा दिल्लीत असतील तेव्हा पंजाब पोलिसांची सुरक्षा स्वीकारण्याचा प्रस्ताव स्वीकारू नये असे कळविण्यात आले आहे. यावरून आता ही घडामोड घडली आहे.