छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
विधानसभेच्या संभाजीनगर ‘पूर्व’ मतदारसंघात अखेर एमआयएमने माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री उशिरा इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. एमआयएमचे कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांचा पंतग कापल्यानंतर आता ‘पूर्व’ची ‘दोर’ इम्तियाज जलील यांच्या हाती आली आहे. कादरी यांनी आठवडाभरापूर्वी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
दोन वेळा पूर्व विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार राहिलेले कादरी यांनी अतुल सावे यांना चांगली लढत दिली होती. थोडक्यात पराभव झाल्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवून आमदार होण्याचे स्वप्न कादरी पहात होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात काम केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
यासंदर्भातला सविस्तर अहवाल पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. तेव्हापासून कादरी यांना पक्षातून बाजूला करण्यात आले होते. अखेर विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर कादरी यांनी इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांच्यावर नाराजी व्यक्त करत आपल्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इम्तियाज जलील हे देवेंद्र फडणवीस यांची ‘बी टीम’ असून ते त्यांचे हस्तक असल्याचा गंभीर आरोप कादरी यांनी केला होता.
मुस्लिम मतदार एमआयएमच्या पाठीशी
या प्रकरणावर मौन बाळगणा-या इम्तियाज जलील यांनी थेट आता पूर्व मतदारसंघात उडी घेत कादरी यांना कायमचे घरी बसवण्याची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातील पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांना विजयी खासदार संदिपान भुमरे यांच्यापेक्षा अधिक मताधिक्य होते. संभाजीनगरात मात्र मुस्लिम मतदार एमआयएमच्या पाठीशी असल्याचे सिद्ध झाले होते.