नागपूर : हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर आमदार यशोमती ठाकूर आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या वादामुळे सभागृहाचे वातावरणच बदलून गेले. स्वत: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खुर्चीवरून उभे राहून सभासदांना खाली बसण्याचे आवाहन करावे लागले. गिरीश महाजनांच्या उत्तरानंतर ‘तुम्ही सत्तेत येऊ शकला नाही म्हणून तुम्ही बेइमानी करून पक्ष फोडला’, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या सरकारने अंगणवाडी सेविकांचे वेतन हे ८ हजारांवरून १० हजार केले. मदतनीसचे वेतन सहा हजारांवरून ८ हजार केले. मात्र, यशोमतीताई ठाकूर या मंत्री राहिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या सरकारच्या काळात काय केले, तुम्ही एक रुपयाही वाढवला नाही,असे म्हणत यशोमती ठाकूर खोटे बोलत आहेत, असा आक्षेप नोंदवला.
गिरीश महाजन आक्रमकपणे म्हणणे मांडत होते. त्यावर विरोधी पक्षाकडून देखील जोरदार प्रतिवाद करण्यात आला. विरोधी पक्षाचे सभासद आसनावरून उठून उभे राहिले. सभागृहाचे सगळे वातावरणच बदलले. सभासदांना शांततेचे आवाहन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आसनावरून उठले आणि उभे राहिले. अध्यक्ष उभा असताना बोलणे ही पद्धत आहे का, अशी विचारणा करत विरोधी पक्षनेते मी उभा आहे तुम्ही बसा, असे म्हणत मंत्र्यांना वेतनवाढीसाठी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाला उत्तर देण्यास सांगितले.
मंत्र्यांकडून जो २५ टक्के वेतनवाढीचा दावा केला जातो तो तसा नाही. मला गणितामध्ये पडायचे नाही. मात्र, केलेला दावा हा खोटा असे मी म्हटले नाही. रेकॉर्डवर चुकीचे आणत आहेत, असे मी म्हटले आहे. आम्ही काय केले असे विचारले जात आहे. कोविडकाळात आम्ही काम केले, असे म्हणत महिलांना मानसन्मान देण्याची यांची संस्कृती नाही, असा टोला यशोमती ठाकूर यांनी महाजन यांना लगावला.