सेंट लुईस : भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने अमेरिकेतील सेंट लुईस येथे खेळल्या गेलेल्या ग्रँड चेस टूर च्या सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २० वर्षीय प्रज्ञानानंदाने पेनल्टीमेट (दुस-या शेवटच्या) फेरीत उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हविरुद्धचा सामना ड्रॉ करून एक फेरी बाकी असतानाच विजेतेपद आपल्या नावावर केले. त्याने ३५ पैकी २३ गुण मिळवले आणि दुस-या स्थानावर असलेल्या खेळाडूंपेक्षा १.५ गुणांनी पुढे राहून आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड चेस टूर रॅपिड अँड ब्लिट्झ विजेतेपद जिंकले.
प्रज्ञानानंदाने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच सातत्याने दमदार कामगिरी केली. रॅपिड आणि ब्लिट्झ दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याने आघाडी कायम राखली. अंतिम फेरीपूर्वी त्याची आघाडी इतकी मजबूत झाली होती की, शेवटच्या सामन्याच्या निकालाचा त्याच्या विजेतेपदावर कोणताही परिणाम होऊ शकला नाही.
चेसबेस इंडियाने दिली माहिती
चेसबेस इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर प्रज्ञानानंदाच्या या यशाची माहिती शेअर केली. संस्थेनुसार, हे त्यांच्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड चेस टूर रॅपिड अँड ब्लिट्झ विजेतेपद आहे. एक फेरी बाकी असतानाच त्यांनी ही स्पर्धा जिंकली.
















