22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूररब्बी पिके जोमात तर द्राक्ष बागायतदार कोमात

रब्बी पिके जोमात तर द्राक्ष बागायतदार कोमात

सांगोला – तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असली तरीही गावोगावी रब्बी हंगामातील पेरणी झालेले ज्वारी, गहू, हरभरा, मका या पिकांना अवकाळी पावसामुळे जीवदान मिळाल्याने शिवारात सदर पिके जोमदार आसल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. तर द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हा वर्ग मदतीची वाट पाहत आहे. तालुक्यात जवळा, कडलास, सोनंद, मांजरी, नाझरे, हातीद, जुनोनी या परिसरातील ज्वारीची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तालुक्यात बहुतांश क्षेत्र रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. ज्या ज्वारीची पेरणी आगाप आहे तेथील ज्वारी अवकाळी पावसाप्रसंगी पोह्यात होती. ती ज्वारी काळी पडली आहे. तर मागास ज्वारी चांगल्या प्रतीची आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीचे उत्पादन वाढण्याची शक्यता असून जनावरांना कडबाही मिळेल, असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

जुनोनी भागात टेंभू योजनेमुळे ज्वारी एक नंबर आहे. यावर्षी उत्पादन चांगले होईल, असे सध्या तरी वाटत आहे. अवकाळी पाऊस झाल्याने गावोगावच्या काळी कसदार जमिनीत मागास ज्वारी जोमदार आहे. अद्यापपर्यंत कुठलाही रोग पडलेला नाही. तसेच पावसामुळे आडवी पडलेली ज्वारी पुन्हा उभी राहिली आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. टेंभूचे पाणी जर लवकर सुटले तर त्या भागातील ज्वारीची उत्पादने मोठ्या प्रमाणात होतील, अशी शेतकरी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.तालुक्याच्या उत्तर भागातील महूद, वाकी शिवणे या परिसरात ऊस, मका ही पिके घेतात. मक्याचे उत्पादन तालुक्यात वाढलेले आहे. परंतु पूर्वी सदर पीक मानव खाद्यान्न म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.

परंतु अलीकडे सदर मक्याचा जास्तीत जास्त उपयोग पशुखाद्य म्हणून केला जात आहे तेही पीक जोमात आहे. गहू, हरभरा ही पिके चांगली आहेत. गेली चार दिवस कडाक्याची थंडी पडली असून त्याचा फायदा पिकांना होईल, अशी शेतकरी मत व्यक्त करीत आहेत. सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असली तरी पिके चांगली आहेत. परंतु द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे या पिकावर रोग वाढले आहेत. यासाठी हजारो रुपयांच्या फवारण्या करूनही फायदा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे द्राक्षासह शेतकरी कोमात आहे.

कोळा परिसरात ज्वारीचे क्षेत्र कमी आहे. फळबागाचे क्षेत्र जास्त आहे. अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष उत्पादकाला बसला आहे. तो अद्याप सावरला नाही शासनाने त्वरित मदत द्यावी, तसेच डाळिंब बागा नष्ट झाल्या आहेत. ३१ वर्षानंतर प्रथमच अवकाळी पाऊस झाला आहे. हा पाऊस रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना चांगला असून यावर्षी ज्वारीचे उत्पादन चांगले होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR