वॉशिंग्टन : अमेरिकेतील सिएटल येथे दिवाळी सोहळ्यादरम्यान उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत भारतीयांविरोधात वर्णद्वेषी घोषणाबाजी केली. जेक लँग आणि त्याचा सहकारी थॉमस अॅलन यांनी शनिवारी कार्यक्रमस्थळी अमेरिकेचा ध्वज फडकावत कपाळावर टिळा किंवा टिकली लावणा-यांना देशाबाहेर काढा, अशा आशयाचे फलक झळकावले. या घटनेचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर अमेरिकी खासदार आणि भारतीय समुदायाच्या नेत्यांनी तीव्र निषेध केला.
सिएटल सेंटर आर्मरी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंचावर नृत्य सुरू असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांना कार्यक्रमस्थळाबाहेर काढण्यात आले. हा सोहळा सिएटल सेंटर फेस्टलचा भाग होता. या महोत्सवात दरवर्षी २५ मोफत सांस्कृतिक कार्यक्रम होतात. सुमारे चार लाख नागरिक सहभागी होतात. जेक लँग हा ‘व्हाइट रिप्लेसमेंट’ संघटनेशी संबंधित असून, ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकी संसद भवनावरील हल्ल्यात सहभागी होता. त्याला २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माफी दिली होती.
भारतीय वंशाच्या सदस्यांकडून निषेध
भारतीय वंशाच्या प्रतिनिधी सदस्य प्रमिला जयपाल यांनी या घटनेला वर्णद्वेषी आणि घृणास्पद म्हटले. माजी व्हाइट हाऊस सल्लागार अजय जैन भुटोरिया यांनीही निषेध केला. उत्तर अमेरिकेतील हिंदू संघटनांनी समुदायाला सतर्क राहण्याचे आवाहन केले. सुनीता विश्वनाथ यांनी घटनांचाही निषेध करण्याची भूमिका मांडली.
















