चिपळूण : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला. त्यावेळी ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. या परिसरात प्रचंड तणाव आहे, त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला.
निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली. भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौ-यावेळी नारायण राणे पिता पुत्रांवर तुफान टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागरमध्ये आज सभेचे आयोजन केले आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवली सभा झाली होती. या सभेत भास्कर जाधवांनी राणेंवर जहरी टीका केली होती. भास्कर जाधव म्हणाले होते की, नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो, शिवाय भास्कर जाधवांनी नारायण राणेंचा नाव न घेता कोंबडी चोर असा उल्लेख केला होता. ज्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांना धडा शिकवा, असेही भास्कर जाधव म्हणाले होते.
राणे जाणीवपूर्वक आले : जाधव
गुहागरमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघात सभा घेण्यासाठी येणार अशी जाहिरातबाजी केली होती. खूप मोठ्या प्रमाणात टिझर व्हायरल करुन लोकांना उचकावण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या कार्यालयासमोर बॅनर लावले होती. हिशेब चुकते करणार, गुन्ह्याला माफी नाही असे आव्हानात्मक बॅनर लावले होते. झेंडे लावले होते. पण चिपळूणची संस्कृती आहे, कोणाच्या झेंड्याला, बॅनरला हात लावायचा नाही. आम्ही कुणीही त्यांच्या झेंड्याला हात लावला नाही. परंत सुभा गुहागरला होती, निलेश राणे मुंबईतून आले. वास्तविक पाहता त्यांनी डायरेक्ट गुहागरला जाऊन सभा घेणे आवश्यक होते, पण ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले असे भास्कर जाधव म्हणाले.
कोकणात वाद शिगेला
कोकणात नारायण राणे आणि भास्कर जाधव यांचा वाद शिगेला पोहचला आहे. त्यातच माजी खासदार निलेश राणे यांची गुहागर येथे सभा होणार आहे. त्यापूर्वीच आमदार भास्कर जाधव यांना धमकीचे फोन आणि मेसेज आल्याने त्यांच्या कार्यालय बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी पोलिस अलर्ट मोडवर आहे.