अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीत खासदारांच्या कार्यालयावरून मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांच्या शासकीय कार्यालयाचा ताबा मिळण्यावरून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे आक्रमक झाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच यशोमती ठाकूर संतप्त झाल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चंद्रकांत पाटील यांच्याकडून यशोमती ठाकूर यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आमदार ठाकूर ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे. हे कार्यालय पूर्वी नवनीत राणा यांना देण्यात आले होते, त्याच पार्श्वभूमीवर कार्यालयाचा ताबा देण्याची मागणी यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली होती. पण, ताबा न मिळाल्याने यशोमती ठाकूर, खासदार वानखडे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आले.
यावेळी कार्यालयाचा ताबा न दिल्याने यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. आम्हाला कार्यालयाचा ताबा द्या अन्यथा कुलूप तोडू, असा इशाराच यशोमती ठाकूर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर दिला. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे करा. याच्यापुढे भाजप सरकार काय करू शकते, असा तिखट सवालही ठाकूर यांनी चंद्रकांत पाटलांना विचारला. त्यासह राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांना दुसरे कार्यालय द्यावे. एकाच कार्यालयात दोन भाग कशाला करता, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले. यानंतर यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांनी खासदार कार्यालयाचे कुलूप तोडून ताबा घेतला. मागासवर्गीय खासदार असल्याने प्रशासन जातीयवाद करत आहे, असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.