बारामती : प्रतिनिधी
बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना राडा झाला आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना आहे. युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी मतदारांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी आज (२० नोव्हेंबर) राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. अशातच बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना असून मतदानाच्या वेळी राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
शर्मिला पवार म्हणाल्या, आज माझ्यासमोर दमदाटी केली. माझ्यासमोर ती व्यक्ती होती. मतदान केंद्राच्या आत स्वत:च्या घरातले लग्नकार्य असल्यासारखे, या, बसा मतदान केले का? अशी विचारणा सुरू होती. खाणाखुणा केल्या जात होत्या, असा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे.
संकेत काय देत होते, माहीत नाही. आम्ही आक्षेप घेतला. तुम्ही असे करू नका, चुकीचे आहे, असे सांगितले. आमचा मोहसीन त्यांना तेच सांगत होता. त्याला धमकी दिली. मग, पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. पोलिस सहकार्य करतायत. मी बाहेर आले, मी आत जात नाही. मी गेटच्या बाहेर आले. मोहसीनला आतमध्ये, बघून घेईन अशी धमकी देण्यात आली’’ असा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे.
डोळ्यांसमोर दिसतंय ते मी सांगितले : शर्मिला पवार
ते अजित पवारांचे कार्यकर्ते होते का? माहीत नाही, ते कोणाचे कार्यकर्ते होते, पण घड्याळाचे आहेत, एवढे सांगू शकते. निवडणूक आयोगाला लेखी तक्रार दिली आहे. सीसीटीव्ही फुटेज डिलीट करतील त्याची भीती वाटते, असे शर्मिला पवार म्हणाल्या. बोगस मतदान होतेय असे तुमचे म्हणणे आहे का? या प्रश्नावर मला त्यावर भाष्य करायचे नाही. डोळ्यांसमोर दिसतंय ते मी सांगितले असे उत्तर दिले.