पुणे : ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील ससूनमधल्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अस्थिरोग विभागातील विद्यार्थ्याबरोबर बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांनी रॅगिंगचे कृत्य केले. याप्रकरणी कॉलेज प्रशासनाने तीन विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहे. अस्थिरोग विभागातील विद्यार्थ्याचे रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक दिवस या विद्यार्थ्याला वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास होत होता. आता या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी ३ विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून काढण्यात आले आहे.
रॅगिंगबाबतची तक्रार मला सोमवारी प्राप्त झाली होती. यानंतर तत्काळ चौकशीसाठी समितीचे पुनर्गठन केले. चौकशी समितीने त्याच दिवशी तातडीने बैठक घेतली. बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांना त्वरित निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणी इतर विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे.