मुंबई : प्रतिनिधी
राहुल गांधी काहीतरी मोठा धमाका करणार असे वातावरण होते. मात्र साधा लवंगी फटाका देखील ते फोडू शकले नाहीत. सगळाच फुसका बार निघाला. राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. रोज खोटे बोलण्याचे गोबेल्स तंत्र ते वापरतात असे टीकास्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडले. राहुल गांधी यांचा एकच गुण वाखाणण्यासारखा आहे तो म्हणजे, ते रोज राष्ट्रीय मिडियासमोर येउन कोणतेही पुरावे न देता धादांत खोटे बोलतात असा टोलाही त्यांनी लगावला.
राहुल गांधी यांनी लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकात भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मोठा घोळ केला असल्याचा आरोप केला आहे. आजही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाच्या मतदारयादीत घोटाळा झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस दिल्या, पण एकही पुरावा ते देउ शकले नाहीत. न्यायालयातही ते जात नाहीत. केवळ खोटे बोलत राहायचे. त्यांना जनतेत जावेच लागेल. तरच कधीतरी त्यांना मिळालेच तर यश मिळेल, अन्यथा नाही. ते कायम संवैधानिक व्यवस्थेचा अपमान करत असतात. खोटे बोलून बिहार जिंकू असे त्यांना वाटते पण बिहार पंतप्रधान मोदींच्याच मागे जाणार.
महाराष्ट्रातला पराभव त्यांना जिव्हारी लागला. त्यांना फार अपेक्षा होती महाराष्ट्रात. त्यांनी मंत्रिमंडळाची रचनाही केली होती. पण जनतेने त्यांना मोठा झटका दिला. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राबाबत केलेली सगळी वक्तव्ये खोटी निघाली. त्याचे पुरावे निवडणूक आयोगाने दिल्याने ते तोंडावर आपटले असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.