नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
हरियाणामध्ये बसलेल्या धक्क्यामुळे काँग्रेस पक्ष आणि पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीत चांगल्या स्थितीत असतानाही काँग्रेसला थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. यापासून धडा घेत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे अधिकाधिक जागांची मागणी करत आहे. मात्र जागावाटपावरून आघाडीमध्ये फूट पडणार नाही एवढाच दबाव काँग्रेसकडून आणला जात आहे. त्यासाठी काँग्रेसकडून सावधपणे पावलं टाकली जात आहेत.
महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे मुस्लिम आणि दलितांची एक भक्कम मतपेढी आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले होते. तसेच सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला होता.
श्रेष्ठींच्या नेतृत्वाखाली निवडणूक
काँग्रेसच्या नेत्यांच्या मते महाराष्ट्रामध्ये काही वेगळ्या समस्या आहेत. हरियाणातील भूपेंद्र स्ािंह हुड्डा यांच्यासारखा मोठा नेता काँग्रेसकडे महाराष्ट्रात नाही. मात्र याचा एक फायदा म्हणजे पक्षाला आपल्या केंद्रीय नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. यावेळी जागा वाटपामध्ये काँग्रेस पक्ष कुठल्याही दबावाखाली काम करणार नाही. महाराष्ट्रामध्ये केवळ विजय मिळवू शकतील, अशा नेत्यांना उमेदवारी देण्यावर राहुल गांधींच्या टीमने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याबरोबरच उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांनी बंडखोरी करू नये यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरील नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
कॉँग्रेसचा तोडगा : मतदारांना देणार ५ गॅरंटी
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेला प्रत्युत्तर देण्यासाठी पाच गॅरंटीची घोषणा करण्यात येणार आहे. यामध्ये रोख मदत, महिलांना मोफत बस प्रवास, १० किलो मोफत धान्य, स्वस्त वीज आणि बेरोजगारी भत्ता यांचा समावेश आहे. त्याबरोबरच जातनिहाय जनगणनेचं आश्वासन दिलं जाण्याची शक्यता आहे.