गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा गड मानल्या गेलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसचे नुकतेच एक अधिवेशन झाले. यानंतर आता काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी पुन्हा एकदा गुजरात दौ-यावर आहेत. दोन दिवस राहुल गांधी गुजरातमध्ये असणार आहेत. तसेच काँग्रेस संघटना सृजन अभियानाची सुरुवात करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उत्तुंग परंपरेच्या सावलीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक झाली. धोरणांचे सूचन आणि आत्मशोधासाठी ही बैठक होती. ‘सत्तारूढ भाजपला नवा धोरणात्मक पर्याय देणे’ याहीपेक्षा ‘संदर्भ हरवत चाललेल्या पक्षाला सावरण्याचा हा प्रयत्न होता. या बैठकीत ‘न्याय पथ संकल्प, समर्पण आणि संघर्ष’ अशा घोषणा अतिशय काळजीपूर्वक तयार करून पुढे करण्यात आल्या. गेल्या चार दशकांत काँग्रेसची ताकद हळूहळू घटत गेली. आताचा काँग्रेस पक्ष विकल, धोरणात्मकदृष्ट्या गोंधळलेला आणि संघटना म्हणून पोकळ झालेला दिसतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेस संघटना सृजन अभियानाची सुरुवात
राहुल गांधींच्या गुजरात दौ-याबद्दल बोलताना काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे की, काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अरावली जिल्ह्यातील मोडासा येथे काँग्रेस संघटना सृजन अभियानाची सुरुवात करतील. जिल्हा काँग्रेस समित्या आणि त्यांच्या अध्यक्षांना सक्षम करून आणि जबाबदारीची एक नवीन प्रणाली सुरू करून पक्ष संघटना मजबूत करणे हे त्याचे पहिले उद्दिष्ट आहे असे केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.