30.2 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्र१४ जुलैपासून राहुल गांधी येणार वारीत

१४ जुलैपासून राहुल गांधी येणार वारीत

पुणे : आषाढ महिना आला की महाराष्ट्रातील तमाम जनतेला वारीचे वेध लागतात. आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन ‘याचि देही, याचि डोळा’ घेतल्यानंतर वारकरी तृप्त होतात. यंदा १७ जुलै रोजी आषाढी आहे. त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. या वारीला आता राजकारणाची चाहूल लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांना वारीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यासाठी त्यांनी वारीचे महत्त्व राहुल गांधी यांना समजावून सांगितले. त्यानंतर राहुल गांधी १४ जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत, असे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

आमदार संजय जगताप म्हणाले की, संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यात दीड लाख वारकरी सहभागी झाले आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी १४ जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे दर्शन ते वारीत घेणार आहेत. तसेच सर्वसामान्य वारक-याप्रमाणे राहुल गांधी वारीत चालतील. राहुल गांधी यांना वारीत सहभागी होऊ न देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवरही संजय जगताप यांनी उत्तर दिले आहे. वारीच्या सोहळ्यात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा. तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर वारीत सहभागी व्हा. वारीच्या सोहळ्यात काय त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न करा.

भाजपकडून शरद पवार यांच्यावर हल्ला
सातत्याने आपल्या आक्रमक वक्तव्यांसाठी, भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारे भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राहुल गांधी यांच्या वारीत सहभागी होण्याचा निर्णयास विरोध केला आहे. हिंदूंना हिंसक म्हणणा-या आणि हिंदूंचा कायम तिरस्कार करणा-या राहुल गांधींना वारीत येण्याचे निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवार यांना कोणी अधिकार दिला? असा प्रश्न आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला आहे.

पवारांना आता आठवली वारी
शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते. पण ८४ वर्षे वयाचे शरद पवार यांचे पाय कधी वारीकडे वळले नाहीत. आता ते कोणत्या तोंडाने राहुल गांधींना निमंत्रण देताहेत? कायम इफ्तार पार्ट्या झोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी यांना आजपर्यंत कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत. आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही वारीत यायला बघताय? हे न कळायला महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही, हे लक्षात ठेवा, असे आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR