नवी दिल्ली : प्रशिक्षण सुरू असताना तोफेचा बॉम्बगोळा फुटला आणि या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला. नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये ही घटना घडली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा सरकार पुन्हा एकदा अग्निवीर योजनेवरून घेरले आहे.
गोहिल विश्वराज सिंग (२०) आणि सैफत शीत (२१) अशी दोन्ही अग्निवीरांची नावे आहेत. त्याच्या मृत्युबद्दल राहुल गांधींनी शोक व्यक्त केला. नाशिकमध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीर गोहिल विश्वराज सिंग आणि सैफत शीत यांचे निधन वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे असे राहुल गांधी म्हणाले. या घटनेने पुन्हा एकदा अग्निवीर योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यांची उत्तर देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. गोहिल आणि सैफतच्या कुटुंबीयांना वेळेवर भरपाई मिळेल का, जी कोणत्याही शहीद जवानाला दिली जाते इतकी असेल?, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
जवान शहीद झाल्यावर भेदभाव का?
राहुल गांधी पुढे म्हणाले की अग्निवीरांच्या कुटुंबीयांना पेन्शन आणि अन्य सरकारी सुविधांचा लाभ का मिळणार नाही? जर दोन्ही सैनिकांच्या जबाबदा-या आणि बलिदान समान आहे, तर ते शहीद झाल्यानंतर हा भेदभाव का असा प्रश्न राहुल गांधींनी भाजपा सरकारला केला आहे.
जवानांच्या बलिदानाचा अपमान
अग्निपथ योजना लष्करासोबत अन्याय आणि आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. एका जवानाचे आयुष्य दुस-या जवानापेक्षा अधिक मूल्यवान आहे का, याचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह यांना घेरले.
अन्यायाविरोधात उभे राहूयात
या, मिळून या अन्यायाविरोधात उभे राहूयात. भाजपा सरकारची अग्रिवीर योजना हटवण्यासाठी, देशातील तरुणांचे आणि लष्कराचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आमच्या जय जवान आंदोलनात आजच सहभागी व्हा असे आवाहनही राहुल गांधींनी केले आहे.