25 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeराष्ट्रीय'भारत जोडो यात्रे'च्या धर्तीवर राहुल गांधींची 'भारत न्याय यात्रा'

‘भारत जोडो यात्रे’च्या धर्तीवर राहुल गांधींची ‘भारत न्याय यात्रा’

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर आता काँग्रेसकडून या यात्रेचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. ‘भारत जोडो यात्रे’च्या धर्तीवर राहुल गांधींची ‘भारत न्याय यात्रा’ निघणार आहे. यावेळी काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेचा प्रवास मणिपूर ते मुंबई असा असणार असून ६२०० किलोमीटर अंतर यावेळी असणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून १४ जानेवारी २०२४ रोजी अर्थात मकरसंक्रांतीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. जास्तीत जास्त लोकांना या यात्रेत सहभागी होता यावे यासाठी या यात्रेत बसचा वापर होणार आहे. तर पदयात्रेदरम्यान छोट्या-छोट्या अंतरासाठी चालण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, असे काँग्रेसकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. पाच महिन्यांच्या लाँग मार्चमध्ये हजारो काँग्रेस कार्यकर्ते तसेच विरोधी पक्षनेते सहभागी झाले होते. जानेवारीत श्रीनगरमध्ये या प्रवासाची सांगता झाली. भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला कर्नाटक आणि तेलंगणात चांगला राजकीय फायदाही झाला आहे. या यात्रेमुळे कर्नाटक आणि तेलंगणाची सत्ता काँग्रेसला मिळाली होती. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील यात्रेचा काँग्रेसला किती फायदा मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

१४ राज्यांमधून यात्रा जाणार
या प्रवासात राहुल गांधी तरुण, महिला आणि समाजातील उपेक्षित लोकांची भेट घेणार आहेत. हा प्रवास ६,२०० किलोमीटरचा असणार असून मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या १४ राज्यांमधून यात्रा जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR