मुंबई : मानहानी खटल्यात राहुल गांधी यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली होती. तर, आमदार सुनिल केदार हे दोषी ठरल्यानंतर त्यांची आमदारकी देखील विधानसभा अध्यक्षांनी २४ तासांत रद्द केली होती. मात्र, कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून आर्थिक लाभ घेणा-या कृषिमंत्री माणिकराव ठाकरे यांना न्यायालयाने दोषी ठरवून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, यावरून काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आता, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहे? धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही? ही मस्ती नाही तर काय? आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने शिक्षा सुनावली, तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही! सत्ता आहे म्हणून ‘आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड‘ ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय ? असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारले.
दररोज सरकारची लाज निघतेय
१९९५ साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. यात मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, ५० हजार रूपयांचा दंडही कोर्टाकडून ठोठावण्यात आला आहे.इतके उद्योगी आणि तेजस्वी लोक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत की दररोज सरकारची लाज निघत आहे, असा हल्लाबोल देखील वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.