मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत मोठा वाद निर्माण झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाबा परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नाहीत, असा गंभीर आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला होता.
पत्रकारांशी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले, राहुल नार्वेकर मला म्हणाले की माझे सगळे प्रिव्हीलेज मी काढून घेईन. मी म्हटले साहेब तुम्ही मला फाशीवर चढवू शकता. त्यावर ते म्हणाले की तुम्हाला माहित असून सुद्धा माझ्यासोबत का पंगा घेताय मग? हे सगळे मी रेकॉर्ड केले आहे. मी त्यांना म्हटले की मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या भावाला, बहिणीला आणि वाहिनीला उमेदवारी द्यायची आहे. यासाठी धमक्या देत आहेत. आमच्या बीएसपीच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, त्यांना बाहेर काढले.
पुढे बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले, संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने हे सगळे केले आहे. तो कृष्णा जाधव, तो म्हणतो की टोकन आम्ही नाही दिले. मी म्हटले तुमचे लोक काऊंटरवर बसवले आहेत, तो म्हणतो ते आमचे लोक नाही. मग चोर आहेत का? कोण आहेत ती माणसे? असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला.
..अन्यथा आम्ही कोणालाही सोडणार नाही
या संदर्भातील सगळी माहिती आम्ही गागरानी साहेबांना सांगितली आहे. आम्ही १२ लोक आहोत, आताही वेळ गेली नाही. आमचे अर्ज घेण्यात यावे, अन्यथा आम्ही कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे. हरिभाऊ राठोड यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने संबंधित प्रकरणावर तातडीने पावले उचलत पालिका आयुक्तांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३० डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. याच दिवशी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ आणि २२७ मधून राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक, बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्ज प्रक्रियेदरम्यान राहुल नार्वेकर स्वत: उपस्थित होते. याच उपस्थितीवरून वादाला तोंड फुटले आहे. इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आरोप केला आहे की, नार्वेकर यांच्या उपस्थितीमुळे दबावाचे वातावरण निर्माण झाले आणि काही उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले.

