लातूर : ‘माझं घर’ प्रकल्पातील राहुल राठोड हा अकरावीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी बुधवार, २३ जुलै २०२५ रोजी सोळा किमी धावत महाविद्यालयातील पहिला दिवस साजरा करणार आहे. एक धाव आरोग्यासाठी असे घोषवाक्य असलेला हा अनोखा उपक्रम आरोग्य जनजागृती व्हावी, यासाठी करण्याचा आपला मानस असल्याचे राहुलने सांगितले. माझं घर, औसा ते दयानंद कला महाविद्यालय, लातूर हे अंतर धावत पार करण्यासाठी त्याला एक ते दीड तास लागेल असा अंदाज आहे.
माणूस प्रतिष्ठान, लातूर द्वारा संचालित ‘माझं घर’ हा प्रकल्प सहा वर्षांपूर्वी सुरू झाला. राहुल राठोड हा या प्रकल्पातील पहिला विद्यार्थी आहे. त्याचे आई वडील ऊसतोड कामगार आहेत. गावात जमीन नसल्याने ऊसतोडणी शिवाय दुसरा कोणताही पर्याय नसणारा हा परिवार आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो माझं घर मध्ये राहून शिक्षण घेत आहे.
प्रकल्पाचे विविध कारणाने चार ठिकाणी स्थलांतर झालं परंतु इतर मुलांप्रमाणे राहुल ही आमच्या सोबत आला. त्याला शिक्षणाची आस आहे. अत्यंत गुणी मुलगा. व्यायामाची प्रचंड आवड असून ऑलम्पिक पर्यंत पोहचून देशासाठी खेळण्याची त्याची इच्छा आहे. भालाफेक आणि वेटलिफ्टिंग या खेळात त्याला आवड आहे. त्याला आयपीएस होऊन पोलिस दलात काम करायची इच्छा आहे. धाराशिव, लातूर, पुणे येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला आहे.
माझं घर, या प्रकल्पात ६१ मुले आहेत. यापैकी २१ मुली असून ही सर्व शिक्षणापासून वंचित घटकातील मुले आहेत. कुठल्याही शासकीय अनुदाना शिवाय हा प्रकल्प चालतो.
















