संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर मध्ये बनावट नोटा छापल्या जात असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी उघडकीस आल्यानंतर पोलिस तपासात एकेक आश्चर्यकारक बाब समोर येत आहे. बनावट नोटा छापण्याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, रेवेन्यू इंटेलिजन्सने देशभरात एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले. त्यात राज्यातील संगमनेर व कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे. संगमनेरातील एका व्यक्तीसह एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
केंद्रीय डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटीलिजन्सला मिळालेल्या गुप्त माहितीतून त्यांनी त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारीची कारवाई केली. देशभरात एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले. यात बहुतांश ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याने ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या रूपाने बाहेरच्या देशातून कुरियर कंपनीच्या माध्यमातून भारतात आला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी संगमनेरमध्ये गुंजाळवाडी गावातील एका कर्मचा-याला तर कोल्हापूरमध्ये दोघांना पथकाने अटक केली. त्यांच्याकडून काही बनावट नोटा आणि नोटा तयार करण्याची साधने जप्त केली.
७ ठिकाणी सुरू होती बनावट नोटांची छपाई
महाराष्ट्रामधील संगमनेर, कोल्हापूरसह हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार या राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. देशभरात टाकलेल्या ११ छापांमध्ये ७ ठिकाणी बनावट चलनी नोटा छपाई सुरू असल्याचे उघडकीस आले.