22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरघरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर धाड

घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर धाड

सोलापूर : राहत्या घरामध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेकडे बोगस गिऱ्हाइकास पाठवून खात्री केली अन् सापळा लावून या प्रकाराचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला. पीडितेची सुटका करण्यात आली. नीलम श्रमजीवीनगर येथे ही कारवाई करण्यात आली. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता तिला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

शहरामध्ये छुप्या पद्धतीने कुंटणखाना सुरू असल्याची खबर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाला खबऱ्यांकडून समजली. त्यानुसार पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांनी खबऱ्याच्या माहितीनुसार नीलम श्रमजीवी नगरातील मार्कंडेय चौकात जाऊन संबंधित घरात बोगस गि-हाईक पाठवून खातरजमा केली. शहानिशा केल्यानंतर सापळा लावून गंगूबाई आण्णप्पा रोकडे (वय ५०) या महिलेला अटक केली. या सापळ्यात आढळलेल्या पीडित महिलेची सुटका करण्यात आली.

सदर महिला आपल्या स्वतःच्या घरामध्ये पीडितेची पिळवणूक करून तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत असे व तिच्या येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका करायची, अशी माहिती समोर आली. सदर महिलेला अटक करून न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता तिला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला. या प्रकरणी सदर महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ व ६ सह भा. दं. वि. वि. ३७० अ (२) अन्वये गुन्हा नोंदला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक महादेव राऊत करीत आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे (गुन्हे), सहा. पोलिस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव राऊत, सहा. फौजदार राजेंद्र बंडगर, हेमंत मंठाळकर, पोलिस नाईक अ. सत्तार पटेल, महिला हवालदार अकिला नदाफ, सुशीला नागरगोजे, सुजाता जाधव, मंडलिक, उषा माळगे, सीमा खोगरे, भुजबळ, मुजावर यांनी केली. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अशाच पद्धतीने यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे. सर्व प्रकारचे कुंटणखाने बंद करण्यात येतील.असे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR