रायगड : दुर्गराज रायगडावर ढगफुटी सदृश्य पावसाने पर्यटकांची त्रेधातिरपीट उडाली. गडावरुन गडपायथ्याला पाय-यांवरुन उतरताना त्यांचा कस लागला. दरम्यान, शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी ३१ जुलैपर्यंत गडावर जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.
उन्हाळी सुटीनंतर पावसाळी पर्यटनासाठी गडावर जाणारा पर्यटक वर्ग मोठा आहे. काल (ता. ७) पावसाळ्यातील गड अनुभवण्यासाठी शेकडो पर्यटक गडावर आले होते. दुपारनंतर ढगफुटी सदृश्य पावसाने मात्र त्यांची कोंडी झाली. महादरवाजा ते वाळुसरे ंिखडी दरम्यानच्या पायरी मार्गावर पाण्याचे लोट वाहू लागल्याने पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी थांबून राहावे लागले. महादरवाजाच्या बुरुजांवरुन पाण्याचे लोट वाहू लागल्यानंतर काही पर्यटकांनी मोबाईलवर त्याचे व्हीडीओ रेकॉर्डिंग केले. पावसाचा जोर ओसरल्यानंतर सर्व जण गड उतार झाले. आज सकाळपासून मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याचे गडावरील रहिवाशांतून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्हा प्रशासन व रायगड विकास प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून ३१ जुलैपर्यंत गडावर पावसाळी पर्यटनासाठी गडमार्ग बंद केल्याचे जाहीर केले. पर्यटकांनी जीव धोक्यात घालू नये व कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावरुन केले.