सोलापूर : सोलापूर भोवती अनेक धार्मिक स्थळे असून सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटनाचा जिल्हा म्हणून घोषित होणे आवश्यक आहे. सोलापूर रेल्वे स्थानक देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकापैकी एक आहे. सध्या रस्ता वाहतुकीपेक्षा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आहे. लवकरच सोलापूरमध्ये विमानसेवाही सुरू होईल असे प्रतिपादन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले.
सोलापूर रेल्वे स्थानकावर आयोजित केलेल्या स्टेशन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, मंडळ रेल्वे प्रबंधक नीरज कुमार दोहरे आदी उपस्थित होते. रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार रेल्वेच्या प्रत्येक विभागामध्ये स्टेशन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार सोलापूर विभागातून सोलापूर आणि पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारात विद्युत रोषणाई, स्क्रीन डिस्प्ले, सोलापूर विभागाने जतन केलेल्या दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन, सोलापुरातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू विक्रीसाठी स्टॉल, एचडीएफसी बँक आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाळकरी मुलांसाठी आयोजित केलेल्या स्टेशन विकास, विकसनशील रेल्वे या विषयावरील निबंध स्पर्धा, भाषण आणि चित्रकला स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. यावेळी आमदार सुभाष देशमुख आणि प्रणिती शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी कदम यांनी रेल्वेच्या कारकिर्दीबद्दल माहिती दिली.
या महोत्सवाचा प्रारंभ शिंग तुताऱ्याचा आवाजाने तसेच संबळ तुणतुणे अशा पारंपरिक शाहिरी वाद्यांच्या गजरात करण्यात आला. या ऐतिहासिक वातावरणात पर्यावरणाचा जागरही सुरू होतो. पंकज चिंदरकर आणि राजकुमार कोळी यांनी पक्षी प्राणी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले होते. तर वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून संजय भोईटे यांचा बियाणे संग्रह व पक्षी पिसांची माहिती देणारे फलक या प्रदर्शनाला लावण्यात आले होते. सोलापूरची प्रसिद्ध चादर, वॉलहॅगिंग यांचे स्टॉल लावण्यात आले होते. डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सोलापूरच्या पक्षी वैभवाबद्दल चलचित्राच्या माध्यमातून माहिती दिली.रेल्वे स्थानक महोत्सवाचे उद्घाटन करताना खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख व रेल्वेचे अधिकारी उपस्थीत होते.