लातूर/परभणी : प्रतिनिधी
मराठवाड्यात सोमवारी लातूर, परभणीसह आणखी काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. मात्र, आज पावसाचा जोर कमी होता. लातूर शहर परिसर आणि लातूर व औसा तालुक्यातील काही भागांत दुपारनंतर पाऊस झाला. अगोदरच मोठा पाऊस झाला आहे. त्यातच आज पावसाने हजेरी लावताच ब-याच ठिकाणी पेरणी खोळंबली. परभणी, धाराशिव, बीड जिल्ह्यातही सायंकाळी तुरळक ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात वीज पडून एक शेतकरी ठार झाला.
राज्यात काही भागांत मान्सून दाखल झाल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परंतु मराठवाड्यात ब-याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मागच्या आठवड्यापासून दररोज पावसाचा धडाका सुरू होता. परंतु हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे सांगण्यात आले. परंतु आज मराठवाड्यात पावसाचा फारसा जोर दिसला नाही. परंतु ब-याच ठिकाणी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरणी खोळंबली. मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्याने शेतशिवारात वापसा होताच शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. त्यामुळे मराठवाड्यात ब-याच ठिकाणी पेरणी सुरू झाली आहे.
त्यामुळे शेतक-यांची लगबग सुरू असतानाच सोमवारी दुपारीही पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. त्यात माहूर तालुक्यातही दुपारनंतर काही ठिकाणी साधारण तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. या पावसादरम्यान, नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील शेख फरीद वझरा येथील शेतक-याचा वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
शेतात काम सुरू असताना पडली वीज
शेतात स्पिंकलरचे पाईप गोळा करीत असताना अचानक वीज अंगावर पडुन नांदेड जिल्ह्यातील माहुर तालूक्यातील शेख फरीद वझरा येथील तरुण शेतक-याचा मृत्यू झाला. सदर घटना सोमवार सायंकाळी ५ वाजता घडली. माहूरपासून १५ किमी अंतरावरील शेख फरीद वझरा येथील तरुण शेतकरी आनंद तुकाराम मुंडे (१८) शेतात स्पिंकलर गोळा करीत असताना ही वीज कोसळली. त्यानंतर तलाठी ए.वी. कुडमेथे व माहूर पोलिस ठाण्याचे जमादार बाबू जाधव, दत्त मांजरी येथील पोलिस पाटील रितेश केंद्रे, यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला.