24.3 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात ५ ते ८ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज

राज्यात ५ ते ८ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज

शुक्रवारपासून आर्द्रता वाढणार

नाशिक : निवडणुकीच्या रणधुमाळीत शुक्रवारपासून अवकाळी पावसाची शक्यता असून राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात अवकाळी पाऊस पडणार असताना तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात हवेची द्रोणीय परिस्थिती निर्माण झाली असल्याने आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. आर्द्रता वाढल्यामुळे पाऊस पडणार आहे. परिणामी शुक्रवार, दि. ५ एप्रिलपासून पुढील चार दिवस दि. ८ एप्रिलपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांत तुरळक तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात वातावरण बदलले असताना तापमान वाढणार आहे. या काळात राज्यातील तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जात आहे. त्याचा परिणाम पावसावर होणार आहे. यामुळे ५ ते ८ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज असून मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. शेतात काढून ठेवलेले रबी पीकही वाया गेले.

आता पुन्हा पावसाचे संकट आल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी ३८ ते ४० अंशाच्या दरम्यान राहील. मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन रात्रीही उकाडा जाणवू शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR