22.2 C
Latur
Sunday, October 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
परतीचा पाऊस राज्याच्या विविध भागांत पडत आहे. जोरदार बरसत असलेल्या या पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने आता शेतक-यांना मदत मिळणार की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.

राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

राज्यातील अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. ब-याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजली आहेत.

विशेषत: भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे आणि नुकसानभरपाईसाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित यंत्रणा कार्यरत करण्यात यावी.

संबंधित अधिका-यांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुकास्तरीय यंत्रणा, इतर सर्व संबंधित विभाग यांनी यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पावसाचा जोर आणखी काही दिवस
बंगालच्या उपसागरात दाना चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या चक्रीवादळामुळे पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत गारपीट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR