बारामती : बारामती आणि दौंड परिसरात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे बारामतीतील नीरा डावा कालवा फुटला. त्यामुळे प्रचंड वेगाने पाणी पालखी महामार्गावर आले आणि काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आला. तसेच बारामतीतील दीडशेहून अधिक घरात पाणी शिरलं. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून एनडीआरएफची दोन पथके या परिसरात दाखल झाली आहेत.
पुणे जिल्ह्यात रविवारी एकूण २२.५ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. इंदापूर आणि बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे घरात पाणी शिरले आहे. बारामतीतील साधारणपणे दीडशेहून अधिक घरात पाणी शिरल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. बारामतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नीरा डावा कालवा फुटला. त्यामुळे प्रचंड वेगाने पाणी पालखी महामार्गावर आलं आणि काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आला. पिंपळीत हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसला. या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचले.
दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेला. या महामार्गावरील पाण्याच्या प्रवाहामुळे एक इनोव्हा कार वाहून गेली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. तर बारामतीतील पेन्सिल चौकाजवळील दोन धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.