मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी काळात होणा-या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. आगामी काळात होणा-या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मनपा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत विचारणा केली.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जमिनीखालून मोठ्या प्रमाणात केबल जातात. या केबल अदानी, अंबानी किंवा रिलायन्स, एअरटेल अशा कोणत्याही कंपनीच्या असू शकतात. या सर्व केबलच्या संदर्भात महानगरपालिका कर का करत नाही? असा प्रश्न आपण आयुक्तांना विचारला असल्याचे राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या संदर्भात राज्य सरकारने काही निर्णय घेतला असल्याचे देखील आयुक्तांनी आम्हाला कळवले आहे.
मात्र तरी देखील या संदर्भात एक पत्र आपण मनपा आयुक्तांना देणार असून जमिनीखालून जाणा-या केबल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल झाल्यास महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या कंपन्या धर्मदाय कंपन्या नाहीत. तर यामध्ये त्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. त्यामुळे या कंपन्यांकडून कर वसूल केला जाऊ शकतो, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतिय नागरिक उपचारासाठी येत असतात. या संदर्भात देखील काही निर्णय होणे आवश्यक असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या या मनपातील रुग्णालयाच्या मोठ्या प्रमाणात परप्रांतिय नागरिक उपचार घेत असतात. या माध्यमातून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा तर परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला आहे.