मुंबई : प्रतिनिधी
नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम रंगला. या सोहळ्याला मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
मात्र या सोहळ्यातील सोनाली बेंद्रे यांच्या उपस्थितीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सिनेमा क्षेत्रातील कलाकारांसोबत चांगली मैत्री असल्याचे अनेकदा दिसून येते. बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरेंमधील मैत्री ही तशी फार जुनी आहे.
१९९६ साली मुंबईत पहिल्यांदा मायकल जॅक्सनच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकत्र दिसून आले. त्यानंतर ३० वर्षांनी आज पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अभिजात मराठी या सोहळ्याला हे दोघे एकत्र दिसले. या दोघांचा व्हीडीओ सोशल मीडियात बराच व्हायरल होत आहे. लोकांनी या दोघांच्या व्हीडीओला खूप पसंतीही दिली आहे. इतक्या वर्षांनीही या दोघांमधील मैत्री तशीच असल्याचे युजर्स म्हणत आहेत.
व्हायरल होणा-या व्हीडीओत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाकडून या काव्यवाचनाच्या या सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी सोनाली बेंद्रे उपस्थित होत्या. सोनाली बेंद्रे, शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात खूप चांगल्या गप्पा रंगल्याचा व्हीडीओ पाहायला मिळाला. त्यानंतर व्यासपीठावर जाताना सोनाली बेंद्रे यांनी राज ठाकरेंना केलेला इशारा कॅमे-यात टिपला गेला. हेच क्षण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
सोनाली बेंद्रे यांनी जिंकली मने
दरम्यान, मराठी भाषा गौरव दिनाच्या या सोहळ्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रेने स्टेजवर येत मराठीतून भाषण करत सर्वांची मनं जिंकली. ती म्हणाली, ‘नमस्कार! आज इथे महाराष्ट्राच्या अनेक दिग्गज व्यक्तींसमोर मी उभी आहे. माझा जन्म जरी बेंद्रेंची सोनाली म्हणून झाला असेल तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझे संपूर्ण बालपण भारतभर फिरण्यामध्ये गेले. पण या सगळ्यात एका गोष्टीत कोणतीही तडजोड नव्हती ती म्हणजे आमच्या घरातला मराठी बाणा. कुठेही राहिलो, कितीही भाषा शिकल्या, कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी झाले तरी आमच्या घरात मात्र मराठीच बोलले जायचे. त्यामुळे १०० टक्के महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरी मराठी ही माझ्यासाठी घर आहे असे सोनाली यांनी म्हटले.