37.1 C
Latur
Sunday, April 6, 2025
Homeमहाराष्ट्रमराठीचे आंदोलन राज ठाकरेंनी मागे घेतले

मराठीचे आंदोलन राज ठाकरेंनी मागे घेतले

बँकांमध्ये मराठीचा वापर व्हावा यासाठी सुरू केले होते आंदोलन अतिउत्साही कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांमध्ये जाऊन या बँकेतील व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही, याची तपासणी करण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सैनिकांनी अनेक बँकांना भेट देत त्याची पडताळणी सुरू केली होती. या दरम्यान काही ठिकाणी मराठी भाषेचा आग्रह धरत गोंधळ घातल्याचे प्रकारही समोर आले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी बँकांतील हे आंदोलन मागे घेतले आहे.

आता सरकारनेच बँका तसेच इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही असे स्पष्ट करताना मराठी लोकांनीही मराठीच्या वापराचा आग्रह धरावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. बँका तसेच इतर आस्थापनांमध्ये मराठीचा वापर केला जातो की नाही हे तपासण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर मनसैनिकांनी बँकांमध्ये धडक दिली होती. यामुळे काही ठिकाणी गोंधळही झाला. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे, पण कोणी कायदा हातात घेउ नये असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी बँकांतील हे आंदोलन मागे घेतले आहे.

राज ठाकरे यांनी आज या संदर्भात एक पत्र काढून हे आंदोलन थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने बँकांना मराठीचा सन्मान करायला लावायला हवा. कायदा हातात घेण्याची आमचीही इच्छा नाही. तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही, असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्यावरचे लक्ष हटू देऊ नका, असे आदेशही त्यांनी यावेळी मनसेसैनिकांना दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेचे नियम सरकारला माहिती आहेत. मुख्यमंत्री म्हणतात कायदा हातात घेऊ देणार नाही, कायदा हातात घेण्याची आमचीही इच्छा नाही. पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणे तुमचे काम नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. आता मराठी जनतेनेच मराठीचा आग्रह धरायला हवा. मराठी समाजानेच कच खाल्ली तर आंदोलने कशाला करायची असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. मात्र यापुढेही कुठे नियम पाळले जात नसतील, अपमान होणार असेल तर माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील असा इशाराही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR