मुंबई : गुढी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दरवर्षी प्रमाणे भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने मनसैनिक तसेच जनता उपस्थित होती.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट शेअर करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी जे औरंगजेब/अफजलखानाबद्दल बोललो, तेच राज ठाकरे बोलले. आभार. महाराजांचा इतिहास पुसू देणार नाही. राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर अतिशय योग्य भूमिका मांडली तीच भूमिका मी विधानसभेत मांडली होती, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. असे म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरे तसेच त्यांचा विधानसभेतील व्हीडीओ पोस्ट केला आहे.
औरंगजेब हा आमचा इतिहास आहे. इतिहास कशासाठी वाचायचा. इतिहासातून बोध घेण्यासाठी वाचायचा. मराठ्यांनी ज्यांना गाडले त्याची प्रतीके नष्ट करून चालणार नाही. जगाला कळले पाहिजे आपण त्यांना गाडले, असे राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले १६८९ ते १७०७ म्हणजे २७ वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता. संभाजी राजांबरोबर लढला. त्यांना क्रूर पद्धतीने मारले. राजाराम महाराज, संताजी धनाजी, ताराराणी साहेब लढल्या. औरंगजेब एकही लढाई जिंकू शकला नव्हता. त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता. पण कमळे नाही. सर्व प्रयत्न केले आणि तो मेला.
औरंगजेब इथे गाडला गेला
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. जगभरातील लोकांना कळते तो काय कारायला गेला होता आणि कसा मेला. तिथे शिवाजी महाराजांचे नाव येते. आता औरंगजेबची ती सजवलेली कबर काढा. त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे. त्या ठिकाणी मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला.